सोलापूर - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अस्तित्व संपल्याची टीका करणारे राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यातील राजकीय कलगीतुरा आता रस्त्यावर आला आहे. जयकुमार गोरे यांच्या विधानानंतर संजय राऊत यांनी वापरलेल्या आक्षेपार्ह आणि शिवराळ भाषेचे पडसाद सोलापुरात उमटले असून, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने संजय राऊत यांचा पुतळा जाळून तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
सोलापूर शहरातील ऐतिहासिक चार हुतात्मा चौकात भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. या वेळी कार्यकर्त्यांनी संजय राऊत आणि ठाकरे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राऊत यांनी जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणी करत संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या पुतळ्याचे दहन केले.
नेमका वाद काय?
काही दिवसांपूर्वी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला होता.
"उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आता अस्तित्वच राहिलेलं नाही. ते केवळ आपलं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. कदाचित येणाऱ्या निवडणुका ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील," असा खोचक टोला गोरे यांनी लगावला होता.या विधानानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अत्यंत आक्रमक झाले. त्यांनी माध्यमांशी बोलताना जयकुमार गोरे यांच्यावर अत्यंत कठोर आणि आक्षेपार्ह शब्दांत पलटवार केला. राऊत यांच्या या भाषेमुळे भाजप कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झाले आहे.

0 Comments