सोलापूर - वाहनाला नंबरप्लेट नसलेल्या चालकास थांबवल्यावरून ट्रॅफिक पोलिसासोबत झालेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्यानंतर संबंधित पोलीस हवालदाराने आपल्या वरिष्ठांकडे सविस्तर स्पष्टीकरण सादर केले आहे. शहर वाहतूक शाखा उत्तर मधील पोलीस हवालदार राजेंद्र खाडे यांनी याप्रकरणी आपला खुलासा सादर करत व्हिडिओमागील खरी वस्तुस्थिती समोर आणली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?-
दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १:०० ते १:३० च्या दरम्यान शहर वाहतूक शाखेचे हवालदार राजेंद्र खाडे हे शांती चौक येथे वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत होते. यादरम्यान HSRP नंबरप्लेट नसलेली एक HF डिलक्स मोटारसायकल (क्रमांक MH 13 BZ 0844) आणि नंबरप्लेट नसलेली एक VIDA इलेक्ट्रिक मोटारसायकल जात असल्याचे पाहून खाडे यांनी त्यांना थांबवले. नंबरप्लेट का नाही? याबद्दल विचारणा करत असताना, गाडी चालकाचे वडील बाळासाहेब अळसंगे आणि VIDA गाडीच्या पाठीमागे बसलेला बाबुराव सराटे (रा. चपळगाव, ता. अक्कलकोट) हे पुढे आले.
पोलिसाला शिवीगाळ अन् अर्धाच व्हिडिओ व्हायरल-
खुलाशानुसार, बाबुराव सराटे यांनी हवालदार खाडे यांच्याशी अरेरावीची भाषा वापरत, "आम्ही आमच्या बापाच्या पैशाने गाडी घेतली, तू अडवणारा कोण? तुझी मुले-बायको भिक मागून जगवता..." अशा शब्दांत थेट पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर जात अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. खाडे यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु सराटे यांनी मोबाईल काढून पोलिसाशी वादाचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली.
दरम्यान, उपस्थित असलेल्या 'नागरिकांमधून एका इसमाने बाबुराव सराटे यांनी पोलिसाला दिलेली शिवीगाळ व अंगावर धावून आल्याचा भाग वगळून, फक्त पोलीस कर्मचाऱ्याचा बोलतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. हाच अर्धावट व्हिडिओ चॅनेल आणि विविध वृत्तपत्रांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित करून पोलिसाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
MSEB कर्मचाऱ्यांची मध्यस्थी अन् दंड भरून प्रकरण मिटले-
वादाचे स्वरूप वाढल्याने सपोनि/घाडगे मॅडम यांनी वॉकीटॉकीवरून बीट मार्शलला पाचारण केले. आरोपींवर पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई करण्यात येणार होती. मात्र, गाडी चालकाचे वडील बाळासाहेब अळसंगे यांनी मध्यस्थी करत "आम्ही सर्व MSEB चे कर्मचारी आहोत, कारवाईमुळे नोकरीत अडचण येईल," अशी विनंती केली. तसेच बाबुराव सराटे यांनी आपल्या कृत्याबद्दल माफी मागितल्याने व तात्काळ HSRP नंबरप्लेट लावून घेण्याचे आश्वासन दिल्याने, हवालदार खाडे यांनी ऑनलाईन चलान करून त्यांना सोडून दिले.
हवालदार खाडे यांनी आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे की, कुटुंबावर केलेल्या अर्वाच्य टिप्पणीमुळे रागाच्या भरात आणि अनवधानाने काही शब्द तोंडून गेले होते.असे खुलासामध्ये सांगण्यात आले आहे.

0 Comments