Ticker

6/recent/ticker-posts

'आई, मी येतो...' अन् थेट कंबर तलावात सापडला व्यंकटेशचा मृतदेह;सोलापुरातील धक्कादायक घटना




सोलापूर - घरचा तो एकुलता एक आधार... आई-वडिलांच्या डोळ्यांतील भविष्याचे स्वप्न आणि बहिणीच्या पाठीवरचा मायेचा छत्र. पण काळाने असा काही घाला घातला की, अवघ्या २६ वर्षांच्या व्यंकटेशचा हसता-खेळता संसार क्षणात उद्ध्वस्त झाला. ४ ऑगस्टच्या सकाळी घरातून बाहेर पडलेला व्यंकटेश पुन्हा जिवंत माघारी परतलाच नाही; परतली ती फक्त त्याची विझलेली काया आणि कधीही भरून न निघणारी एक भयानक पोकळी.

एमआयडीसीतील टॉवेल कारखान्यात दिवस-रात्र कष्ट उपसून कुटुंबाचा गाडा हाकणारा व्यंकटेश पाडुरंग बलमेरी (वय २६, रा. गवळी वस्ती, ओम अवंती नगर) ४ ऑगस्ट रोजी कोणालाही काही न सांगता घराबाहेर पडला. मुलगा घरी परतला नाही म्हणून हवालदिल झालेल्या आई-वडिलांनी आणि मित्रांनी त्याला शोधण्यासाठी रेल्वे स्टेशनपासून एसटी स्टँडपर्यंत पायपीट केली. शोध घेत असतानाच विजापूर रोडवरील कंबर तलावाजवळ, रेल्वे पटरीशेजारी त्याची दुचाकी आणि मोबाईल सापडला.

"मित्राशी बोलताना ढसाढसा रडला..."

घटनेपूर्वी व्यंकटेशने आईशी आणि एका मित्राशी फोनवर संवाद साधला होता. मित्राशी बोलताना त्याचा कंठ दाटून आला होता, तो जोरात रडत होता... आणि अचानक फोन कट झाला. ते रडणे, ती आर्त हाक कशासाठी होती? तो कोणत्या संकटात सापडला होता? या प्रश्नांची उत्तरे मिळण्याआधीच, ५ ऑगस्टच्या रात्री १० वाजता कंबर तलावाच्या साचलेल्या पाण्यात त्याचा मृतदेह तरंगताना आढळला.ज्या मुलाला कष्ट करून लहानाचे मोठे केले, ज्याच्या लग्नाचे आणि भविष्याचे स्वप्न आई-वडिलांनी पाहिले होते, त्याचा मृतदेह श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला, तेव्हा आई-वडिलांच्या आक्रोशाने संपूर्ण परिसर हादरून गेला.

"माझ्या लेकाने मित्रांकडून काही पैसे घेतले होते, त्या पैशांसाठीच त्याला कोणीतरी धमकावले आणि त्याचा बळी घेतला," असा संशय व्यक्त करत नातेवाईकांनी न्यायाची मागणी केली आहे. पोलिसांनी बेपत्ताची नोंद घेत आता या घटनेच्या सखोल तपासाला सुरुवात केली आहे.व्यंकटेशच्या अशा अचानक आणि संशयास्पद जाण्याने बलमेरी कुटुंबाचा एकमेव दीप मालवला असून, संपूर्ण सोलापूर शहरात आणि गवळी वस्ती परिसरात प्रचंड हळहळ आणि शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments