मराठी शिकून उद्या पत्रकारितेत आले तर काय कराल?'; राज ठाकरेंचा पुणेकरांना मिश्किल सवाल

 



पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात मराठी भाषेच्या अस्मितेवरून आणि परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला. "परप्रांतीयांना मराठी शिकवण्याचे सल्ले दिले जातात, पण उद्या तेच लोक मराठी शिकून पत्रकारितेत आले आणि 'वरुणराज भिडे' पुरस्कार घेऊ लागले तर कसं वाटेल?" असा मिश्किल पण टोकदार सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

राज्यकर्त्यांच्या 'मवाळ' धोरणावर टीका

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले की, "दुसऱ्या राज्यांतून येणाऱ्या लोकांची स्वतःची राज्ये का सुधारली नाहीत, हा प्रश्न कोणीही विचारत नाही. महाराष्ट्रात येऊन धमक्या दिल्या जातात आणि आपले राज्यकर्ते मात्र हात चोळत बसतात. हे नेमके कोणाच्या दबावाखाली चालले आहे? तामिळनाडू, बंगाल किंवा गुजरातमध्ये अशा प्रकारची हिंमत कोणाची होत नाही, मग महाराष्ट्रातच हे का घडते?"

'जिथे जमीन भुसभुशीत, तिथेच घुशी होतात'

परप्रांतीयांच्या वाढत्या प्रभावावर भाष्य करताना त्यांनी एका मार्मिक उदाहरणाचा वापर केला. "जिथे जमीन भुसभुशीत असते तिथेच घुशी शिरतात, खडकात नाही. जी लोकं आणि जी राज्ये आपल्या भूमिकेवर टणक राहतात, तिथे कोणाचेही फावत नाही. पण आपल्याकडे धोरण मवाळ असल्याने परप्रांतीय इकडे येऊन आपल्याच नाकावर टिच्चून 'मराठी बोलणार नाही' अशी भाषा करतात," असेही ठाकरे यांनी नमूद केले.

पत्रकारांनाही लगावला टोला

यावेळी त्यांनी माध्यमांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "आम्ही भूमिका घेतली की पत्रकार विचारतात 'मारणे हा उपाय आहे का?'. मग लिहून हे प्रश्न सुटणार आहेत का? ते लिहून ऐकणारे लोक आहेत का?" असा सवाल त्यांनी केला. "आम्ही आधी हात जोडून जातो, पण ऐकले नाही तर हात सोडून जावे लागते. आपल्या भाषेसाठी आणि राज्यासाठी जनता आणि नेत्यांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे," असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


Post a Comment

0 Comments