उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आता अस्तित्वच राहिलेलं नाही, ते केवळ आपलं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. कदाचित येणाऱ्या निवडणुका ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील, असा अत्यंत खोचक टोला राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी लगावला आहे. गोरेंच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आक्रमक झाले असून त्यांनी जयकुमार गोरेंवर शिवराळ भाषेचा वापर करत जोरदार पलटवार केला आहे.
देहू येथे भाजपच्या नवीन कार्यालयाचे आणि रुग्णवाहिकेचे उद्घाटन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना गोरे यांनी विरोधी पक्षावर जोरदार निशाणा साधला.
विरोधकांना काम उरलेले नाही: जयकुमार गोरे-
गोरे म्हणाले की, "सध्या विरोधी पक्षाला काहीही काम उरलेले नाही. लोकशाहीत विरोधी पक्षाने सरकारवर अंकुश ठेवणे अपेक्षित असते आणि त्यासाठी संसदेत किंवा सभागृहात चर्चा करणे गरजेचे असते. मात्र, तसे न करता विरोधी पक्ष रस्त्यावर बाहेर पडून आंदोलने करत बसतात. जनतेला या सगळ्या गोष्टी चांगल्याच समजतात." पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत म्हटले की, "उद्धव ठाकरेंची शिवसेना संपली असून आगामी निवडणुका ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढताना दिसतील."
संजय राऊतांचे तीव्र शब्दांत प्रत्युत्तर-
जयकुमार गोरेंच्या या वक्तव्याचे पडसाद ठाकरे गटात उमटले असून खासदार संजय राऊत यांनी गोरेंवर अत्यंत कडक आणि शिवराळ भाषेत टीका केली आहे. गोरेंच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय कलगीतुरा अधिकच रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

0 Comments