सोलापूर - घरासमोर मित्रांसोबत खेळताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने एका सात वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथे शुक्रवारी दुपारी घडली. बाबू तानाजी होळकर (वय ७, रा. कारंबा, ता. उत्तर सोलापूर) असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे कारंबा परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
खेळता खेळता गेला तोल-
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबू शुक्रवारी दुपारी आपल्या घरासमोर मित्रांसोबत खेळत होता. खेळण्याच्या ओघात अचानक त्याचा तोल गेला आणि तो घरासमोरच असलेल्या पाण्याच्या आडात (विहिरीत) पडला. बाबूचा अचानक आवाज बंद झाल्याचे आणि तो दिसत नसल्याचे लक्षात येताच त्याच्यासोबत खेळणाऱ्या बालकांनी आरडाओरड केली.
ग्रामस्थांचे बचावकार्य पण...-
मुलांचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक व ग्रामस्थ तत्काळ मदतीला धावून आले. सुमारे १५ मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर चिमुकल्या बाबुला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. त्याला तातडीने सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, विहिरीत पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
परिसरात शोककळा-
चिमुकल्या बाबूवर कारंबा येथे अश्रूपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची माहिती डॉ. तुषार मधुकर निंबोरे यांनी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात दिली असून, पोलिस हेड कॉन्स्टेबल पिरजादे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

0 Comments