Ticker

6/recent/ticker-posts

धक्कादायक ! उपचाराच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक कृत्य; माढ्यात इलेक्ट्रोपॅथी डॉक्टरवर ‘पोक्सो’सह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल




माढा - वैद्यकीय पेशाला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना माढा तालुक्यात समोर आली आहे. उपचाराच्या बहाण्याने तसेच विविध प्रलोभने दाखवून अल्पवयीन शाळकरी मुलांवर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या एका ५५ वर्षीय इलेक्ट्रोपॅथी डॉक्टरवर कुर्दुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी डॉक्टरला शुक्रवारी ताब्यात घेतले आहे.डॉ. दत्तात्रय पांडुरंग कुलकर्णी (वय ५५, रा. माढा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नेमकी घटना काय?-

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी डॉ. कुलकर्णी हा कुर्दुवाडी परिसरात इलेक्ट्रोपॅथी वैद्यकीय व्यवसाय करतो. त्याने आपल्या क्लिनिकमध्ये उपचारासाठी येणाऱ्या आणि परिसरातील इयत्ता ७ वी ते १० वीत शिकणाऱ्या अल्पवयीन शाळकरी मुलांना जाळ्यात ओढले. उपचाराचा बहाणा करून आणि वेगवेगळी प्रलोभने दाखवून त्याने गेल्या काही काळापासून सुमारे चार अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे.

पीडित मुलाचे धाडस आणि तक्रार-

डॉक्टरच्या या कृत्याला कंटाळून अखेर एका पीडित मुलाने हिंमत दाखवून कुर्दुवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पीडित मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून आरोपी डॉ. दत्तात्रय कुलकर्णी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आणि त्याला शुक्रवारी ताब्यात घेतले.

 पोक्सो आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा-

पीडित मुलाच्या तक्रारीवरून कुर्दुवाडी पोलिसांनी आरोपी डॉ. कुलकर्णी याच्यावर बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो - POCSO) कायद्यासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे.या घटनेमुळे माढा तालुका आणि कुर्दुवाडी परिसर हादरून गेला असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास  उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा करत आहेत.

Post a Comment

0 Comments