सोलापूर - सोलापूर शहरामध्ये वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. शेअर बाजार गुंतवणूक, पार्ट-टाइम टास्क, डिजिटल अरेस्ट आणि नोकरीचे आमिष दाखवून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली जात आहे. या फसवणुकीतील रक्कमेची हेराफेरी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 'म्युल बँक खात्यां'वर सोलापूर शहर पोलीस आणि सायबर विभागाने मोठा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. आतापर्यंत अशा ११० खातेदारांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
४०० ते ४५० संशयित म्युल खाती रडारवर-
पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त डॉ. अश्विनी पाटील (गुन्हे/विशा) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर सायबर पोलिसांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. प्राथमिक तपासात सोलापूर शहरात सुमारे ४०० ते ४५० म्युल बँक खाती सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले आहे. या खात्यांची माहिती बँकांकडून मागवून संबंधित खातेदारांवर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
खातेदारांवरही होणार कायदेशीर कारवाई -
काही नागरिक पैशांच्या किंवा इतर आमिषाला बळी पडून स्वतःच्या नावावरील बँक खाती, चेकबूक, एटीएम कार्ड, ऑनलाइन अॅक्सेस किंवा मोबाईल सिमकार्ड सायबर गुन्हेगारांना वापरण्यासाठी देतात. अशा खात्यांचा वापर सायबर फ्रॉडमधील बेकायदेशीर रक्कम स्वीकारणे, पुढे पाठवणे व वेगवेगळ्या व्यवहारांसाठी (Transactions) केला जातो. यामुळे सायबर गुन्हेगारांशी संगनमत केल्याप्रकरणी BNS कलम ३१८ (४), ३१७ (२), ३ (५) अंतर्गत सोलापूर सायबर पोलीस ठाण्यात ११० खातेदारांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
पोलीस प्रशासनाचे सोलापूरकरांना आवाहन -
सोलापूर पोलीस दलाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.पले बँक खाते, ऑनलाइन अॅक्सेस, चेकबूक, एटीएम किंवा सिमकार्ड इतर कोणालाही वापरण्यास देऊ नका. अन्यथा स्वतःवर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार राहील.व्हॉट्सअॅप कॉल्स, डिजिटल अरेस्ट किंवा ब्लॅकमेलिंगच्या धमक्यांना न घाबरता त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.कोणतीही फसवणूक झाल्यास त्वरित नजीकच्या पोलीस ठाण्यात, पोलीस आयुक्त कार्यालय (३ रा मजला, सायबर पोलीस ठाणे) येथे प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा १९३० (NCRPI) या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.
0 Comments