Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

सोलापूर विद्यापीठ कॅम्पसमध्ये काढण्यात आली मतदार जनजागृती रॅली!

 



सोलापूर  - लोकशाही प्रक्रियेत सुजाण, कर्तव्यदक्ष व जागरूक मतदार घडविण्याच्या उद्देशाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात स्त्रीशक्ती स्वयंसिद्धा केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मतदार जनजागृती अभियान’ अंतर्गत मतदार जनजागृती रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले.यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ अतुल लकडे आदी उपस्थित होते. विद्यापीठ परिसरातून ही मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. “मतदान हा अधिकारच नव्हे तर कर्तव्य आहे”, “लोकशाही बळकट करूया” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.


यावेळी कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मतदानाचे महत्त्व, लोकशाही मूल्यांचे रक्षण व जबाबदारीने मतदान करण्याचे आवाहन केले. विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी मतदान जनजागृती आणि मतदानाचा हक्क बजावणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन स्त्रीशक्ती स्वयंसिद्धा केंद्राच्या समन्वयक डॉ. अंजना लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमात विद्यापीठातील विविध विभागांतील विद्यार्थी, अध्यापक व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवला.


तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन व राष्ट्रीय सेवा योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘१६ वी राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धा – उत्कर्ष २०२५-२६’ मध्ये सहभागी झालेल्या राज्यातील १६ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनीही मतदान जनजागृती रॅलीत सहभाग नोंदविला. या अभियानाच्या माध्यमातून मतदान हे केवळ अधिकार नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, ही जाणीव सहभागींच्या मनात दृढ करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. राजेंद्र वडजे, विद्यार्थी विकास केंद्राचे समन्वयक डॉ. केदारनाथ काळवणे व डॉ. विनायक धुळप यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या