सोलापूर- जोशी गल्ली, रविवार पेठ परिसरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहर प्रमुख बाळासाहेब पांडुरंग सरवदे याची तलवार व कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्या प्रकरणी आरोपी अमर शंकर शिंदे,अतिश शंकर शिंदे व तानाजी बाबू शिंदे यांनी घटनेवेळी वापरलेले तलवार व कोयताची विल्हेवाट लावलेली गाडी जप्त करणे आहे, सर्व हत्यार कोठून आणले याचा शोध घ्यायचा आहे व सर्व आरोपीचे समोरासमोर रुजवत घालून जॉईंट इन्व्हेस्टीगेशन करण्यासाठी आरोपीचे वाढीव पोलीस कोठडीची मागणी तपास अधिकाऱ्याने केलेली होती. याला विरोध करताना आरोपींतर्फे अँड. संतोष न्हावकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले कि, या आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार रोहित नावाच्या आरोपीकडून जप्त केलेले आहे व गाडी त्यानेच वापरली आहे त्यामुळे ती गाडी जप्त करण्यासाठी या आरोपींच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नाही व यापूर्वी देण्यात आलेली चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती त्यामुळे आता पुन्हा कोठडी वाढविण्याची गरज नाही असा युक्तिवाद केला. तो मान्य करून न्यायालयाने पोलिसांची पोलीस कोठडीची मागणी फेटाळून अमर शंकर शिंदे, अतिश शंकर शिंदे व तानाजी बाबू शिंदे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
याबाबत हकिकत अशी की, मयताचे भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे (वय २५, रा. जोशी गल्ली, रविवार पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींनी निवडणुकीत उभे राहू नये म्हणून धमकी दिली होती.
अपक्ष अर्ज मागे घ्या, नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी उघड धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. दि. २ जानेवारी रोजी दुपारी १ ते सायंकाळी ४.४५ च्या दरम्यान हनुमान मंदिराजवळ आरोपींनी वाद घालून बाळासाहेब सरवदे यांच्या डोळ्यांत चटणी टाकून त्यांना काहीही दिसू नये अशी स्थिती निर्माण केली. त्यानंतर काही आरोपींनी त्यांचे हात पकडले, तर काही आरोपींनी तलवार व कोयत्याने छातीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेप्रकरणी दि.3/1/26 रोजी अमर शंकर शिंदे, अतिश शंकर शिंदे व तानाजी बाबू शिंदे या 3 आरोपींना अटक करण्यात आली होती त्यांना मे. कोर्टाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांची पोलीस कोठडी आज संपणार असल्याने पोलिसांनी आज पुन्हा न्यायालयात करून चार दिवस वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली होती परंतु मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती. मर्ढेकर सो यांनी ती मागणी फेटाळून आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
यात आरोपी तर्फे अँड. संतोष न्हावकर, अँड.राहुल रूपनर, अँड मीरा पाटील, अँड. सुहासिनी कांबळे, अँड. पुष्पा पसारगे यांनी तर सरकार पक्षातर्फे अँड. तुषार लिमन यांनी काम पाहिले.

0 टिप्पण्या