Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

सोलापूर महानगरपालिकेतील नवनिर्वाचित भाजपाचे 87 नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना






सोलापूर - सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला बहुमतासह भरघोस यश मिळाल्यानंतर महापालिकेत सत्ता स्थापनेच्या दृष्टीने आवश्यक अशा पुढील प्रक्रिया वेगाने सुरू झालेल्या आहेत. त्यानुसार भाजपाच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांच्या गट नोंदणीची प्रक्रिया आज पुणे येथे पार पडणार आहे.पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पक्षनिहाय गट नोंदणी करणे ही महापालिकेतील सत्ता संरचनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची पायरी मानली जाते. या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेतील भाजपाचे नवनिर्वाचित 87 ही सर्व नगरसेवक मंडळी आज पहाटे सोलापूरहून पुण्याकडे रवाना झाली. यासाठी विशेष अशी लक्झरी बस उपलब्ध करून देण्यात आली असून काही नगरसेवक स्वतःच्या खासगी वाहनाने देखील पुण्याकडे निघाले आहेत.या संपूर्ण प्रवासाचे आणि पुढील राजकीय घडामोडींचे मार्गदर्शन पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर हे करत आहेत. त्यांच्या उपस्थितीत व नेतृत्वाखालीच नगरसेवकांचा हा ताफा विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात दाखल होणार आहे. दुपारी नियोजित वेळेनुसार पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या गटाची अधिकृत नोंदणी पार पडेल.


गट नोंदणीची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापौर, उपमहापौर तसेच स्थायी समितीसह विविध विषय समित्यांच्या स्थापनेचा मार्ग मोकळा होणार आहे. भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने महापौरपदासह महत्त्वाच्या पदांवर पक्षाची पकड अधिकृतरीत्या मजबूत होण्याची शक्यता आहे. सोलापूर महापालिकेतील पुढील राजकीय समीकरणे, सत्तास्थापनेसंदर्भातील हालचाली आणि पदवाटपाची चर्चासत्रे याला वेग येणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.दरम्यान, भाजपाच्या गट नोंदणीमुळे विरोधी पक्षांच्या रणनीतीवरही परिणाम होणार असून पुढील काही दिवसांत सोलापूर महापालिकेतील सत्तासमीकरण कोणत्या स्वरूपात उभे राहते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या