सोलापूर : सोलापुरातील विजापूर बेस परिसरातील मार्कंडेय मंदिराजवळ जिमला जात असलेल्या दोघांवर कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना १३ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे.
नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसार, तालिब कुरेशी आणि मुज्जो बागवान यांच्यावर हल्ला करण्यात आला. दोघे जिमला जाण्यासाठी निघाले असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.
हल्लेखोर गेल्या दोन दिवसांपासून दोघांवर लक्ष ठेवून होते, असा गंभीर आरोपही नातेवाईकांनी केला आहे. तसेच दोघांना जीवे मारण्याच्या उद्देशानेच हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या हल्ल्यात दोघे जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून, घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणामागील नेमके कारण काय आणि हल्ल्यामध्ये किती जण सहभागी होते, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
नातेवाईकांनी केलेले आरोप तपासात कितपत खरे ठरतात, हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.