सोलापूर - प्रियकराकडून होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून एका 21 वर्षीय तृतीयपंथीयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. या घटनेमुळे शहरात आणि विशेषतः तृतीयपंथीय समाजात मोठी खळबळ उडाली आहे.अभिजीत उर्फ कोमल हरिबा नागटिळक (वय 21 रा. कोळी वस्ती, होटगी, दक्षिण सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तृतीयपंथीयाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोमलचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, या संबंधातून गेल्या काही काळापासून प्रियकराकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता, असा आरोप कोमलच्या गुरूंनी केला आहे. सततच्या त्रासाला कंटाळून कोमलने साखर कारखाना परिसरातील स्मशानभूमीत लोखंडी अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आपले जीवन संपवले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, या घटनेचे वृत्त समजताच सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल परिसरात तृतीयपंथीय समाजातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, संबंधित आरोपी प्रियकराची कसून चौकशी करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तृतीयपंथीय समाजाकडून होत आहे. पोलीस तपासानंतरच या घटनेमागील सर्व सत्य समोर येईल.
