वर्गणीच्या नावाखाली हॉटेल व्यावसायिकाला ३ लाखांची मागणी; जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सोलापुरात गुन्हा दाखल

 


सोलापूर - गणेशोत्सवाच्या वर्गणीच्या नावाखाली एका हॉटेल व्यावसायिकाकडे तब्बल तीन लाख रुपयांची जबरदस्तीने मागणी करत, पैसे न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना सोलापुरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी १५ सप्टेंबर रोजी सोलापूरच्या फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुरारजी पेठ येथील हॉटेल व्यावसायिक एकनाथ सोपान घाडगे (वय ६७) यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हॉटेल आहे. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास निराळे वस्ती येथील क्रांती तालीम गणेशोत्सव मंडळाचा सदस्य आरोपी नेताजी शिवाजी शिंदे (रा. निराळे वस्ती, सोलापूर) हा घाडगे यांच्या हॉटेलमध्ये गेला. मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी ५०० ड्रेस तयार करण्यासाठी टेलरला प्रत्येकी ६०० रुपये याप्रमाणे एकूण ३ लाख रुपयांच्या वर्गणीची मागणी त्याने घाडगे यांच्याकडे केली.


यावर फिर्यादी एकनाथ घाडगे यांनी आपली सध्या एवढी आर्थिक परिस्थिती नसल्याचे सांगत, दरवर्षीप्रमाणे २५ हजार रुपये वर्गणी देण्याची तयारी दर्शवली. तसेच यापूर्वीही मंडळाला २ लाख रुपये दिल्याचे सांगून आरोपीला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या आरोपी नेताजी शिंदे याने ३ लाख रुपयांच्या आग्रहावरून घाडगे यांच्या अंगावर धावून जात त्यांना अश्लील शिवीगाळ केली. तसेच पैसे न दिल्यास 'जिवे ठार मारू' अशी धमकी देत अंगावर धावून मारहाण केली. या घटनेमुळे प्रचंड घाबरल्याने ६७ वर्षीय फिर्यादी घाडगे यांना चक्कर येऊन ते खाली पडले.


घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव राऊत यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. या जबरन वसुली आणि धमकीप्रकरणी आरोपी नेताजी शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील करत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post