सोलापूर: प्रभाग क्रमांक 20 मधील प्रलंबित विकासकामांवरून उठलेले वादळ अखेर शमले आहे. महापालिकेकडून एमआयएमच्या प्रतिनिधींना अखेर विकासनिधी प्राप्त झाला असून, प्रभागातील भीमाशंकर नगर परिसरात लवकरच नवीन रस्ते बनविण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. निधी मिळाल्यामुळे आता प्रभागातील विकासकामांना मोठा वेग आला आहे.
काही दिवसांपूर्वीच याच प्रभागातील माजी नगरसेविका तसलीम इरफान शेख यांनी आपल्या कामाचा धडाका दाखवत सिद्धेश्वर नगर भाग २, ३ आणि ४ मध्ये नवीन रस्ते बनविण्याच्या कामाला सुरुवात केली होती. विरोधी गटाकडून वेगाने सुरू झालेल्या या कामांमुळे एमआयएमला मत देऊन निवडून आणलेल्या नागरिकांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांकडून एमआयएमच्या नगरसेवकांच्या कामगिरीवर आणि निधीअभावी रखडलेल्या कामांवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
मात्र, आता एमआयएमला हक्काचा विकासनिधी मिळाल्याने भीमाशंकर नगरमधील रस्तेनिर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांची रस्त्यांची जुनी समस्या सुटणार असून प्रभागात दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.
