सोलापूर - शेतात हिरवं रान फुलवण्यासाठी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी धडपडणाऱ्या एका तरुण शेतकऱ्याच्या संसारावर काळाने अचानक घाला घातला आहे. शेतातील पाण्याची इलेक्ट्रीक मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या सोमनाथ कांतीलाल मोरे (वय ३२, रा. वडवळ, ता. मोहोळ) या तरुण शेतकऱ्याचा विजेचा तीव्र धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना सोमवारी (५ ऑगस्ट) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण वडवळ गावावर शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं? -
सोमनाथ मोरे हे गेल्या ७ वर्षांपासून संजय मोरे यांची शेती कसून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत होते. संपूर्ण कुटुंब शेतातील वस्तीवरच राहून रात्रंदिवस कष्ट करत होते. नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास सोमनाथ शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीवरील इलेक्ट्रीक मोटार चालू करायला गेले. मात्र, बराच वेळ उलटूनही ते परत न आल्याने त्यांची पत्नी काजल या काळजीपोटी विहिरीकडे गेल्या.
तेथे पोहोचताच काजल यांच्या पायाखालची जमीनच सरकली. विहिरी शेजारी असलेल्या इलेक्ट्रीक पेटीजवळ सोमनाथ निपचित पडलेले दिसले. पतीने प्राण वाचवण्यासाठी केलेल्या धडपडीचा थरार पाहून पत्नीने हंबरडा फोडला. त्यांच्या आक्रोशाने संपूर्ण वस्ती हादरून गेली. कुटुंबातील सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सोमनाथ यांना खाजगी वाहनाने मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर -
कष्टाच्या जोरावर कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या सोमनाथ यांच्या अशा अचानक जाण्याने मोरे कुटुंबाचा मुख्य आधारच हिरावला गेला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले व भाऊ असा परिवार आहे. ऐन उभारीच्या वयात काळाने घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी मृत सोमनाथ यांचे भाऊ रवींद्र कांतीलाल मोरे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात खबर दिली असून, मोहोळ पोलीस या दुर्दैवी घटनेचा पुढील तपास करत आहेत.

0 Comments