Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात 'बोगस दिव्यांग प्रमाणपत्र' घोटाळा उघडकीस; ६ जणांना अटक

 


सोलापूर - सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे मिळवून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत चौघांना अटक केली आहे, तर शासकीय रुग्णालयातील दोन लिपिकांवरही गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड करण्यात आले आहे.

बनावट आधार कार्ड आणि पत्त्याचा वापर-

मिळालेल्या माहितीनुसार, ४५ टक्के अपंगत्वाची बोगस प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी आरोपींनी बनावट पत्ते आणि खोटे आधार कार्ड तयार केले होते. या बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय रुग्णालयातून अपंगत्वाचे दाखले लाटण्यात आले.या प्रकरणात  विजय बाळासाहेब गर्जे (शिक्षक, रा. नगर),राजेश भाऊसाहेब जाधव (कनिष्ठ लिपिक, पाटबंधारे विभाग),महेश दिनकर बारगज  रमेश रमाकांत ढवण या चार आरोपींचा समावेश आहे.

रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांचाही सहभाग-

या संपूर्ण घोटाळ्यात सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार शहरातील सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सागर राजपूत (वरिष्ठ लिपिक, शासकीय रुग्णालय),वसीम खान (कनिष्ठ लिपिक, शासकीय रुग्णालय) या दोन्ही लिपिकांना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.

अधिष्ठातांच्या फिर्यादीवरून कारवाई-

दिव्यांग संघटनांनी याप्रकरणी संशय व्यक्त करत प्रशासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत सोलापूर शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांनी ३ सदस्यीय चौकशी समिती गठीत केली होती. समितीच्या चौकशीत गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर डॉ. जयकर यांनी स्वतः पोलिसांत फिर्याद नोंदवली.

या कारवाईमुळे शासकीय यंत्रणेत बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे लाभ घेणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, गुन्हे शाखा पोलीस या प्रकरणात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे याचा सखोल तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments