Ticker

6/recent/ticker-posts

सोलापुरात इन्स्टाग्राम रील्स अन् फॉलोअर्सवरून तरुणावर जीवघेणा हल्ला; जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल



सोलापूर - इन्स्टाग्रामवरील रील्स आणि फॉलोअर्स कमी केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका अल्पवयीन तरुणावर स्टीलच्या कड्याने डोक्यात मारहाण करून जखमी केल्याची घटना सोलापुरातील भवानी पेठ, धोत्रेकर वस्ती परिसरात घडली आहे. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

​गजानन काळे आणि मल्लिकार्जुन सुलतानपुरे (दोघे रा. धोत्रेकर वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रोहित व्हनप्पा गोडनवरु (वय १७ वर्ष ५ महिने, रा. धोत्रेकर वस्ती, सोलापूर) या तरुणाने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

घटनाक्रम आणि मारहाणीचे कारण-
​पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९:२० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी रोहित हा भवानी पेठ येथील भाईकट्टी यांच्या गोडाऊनसमोर बसला होता. यावेळी आरोपी गजानन काळे तेथे आला. "तू माझे इन्स्टाग्रामवरील रील्स आणि फॉलोअर्स कमी का केले?" असा जाब विचारत गजाननने रोहितला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.  

​वाद वाढल्यानंतर गजाननने हातातील स्टीलच्या कड्याने रोहितच्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले. भांडणाचा आवाज ऐकून गजाननचे काका आरोपी मल्लिकार्जुन सुलतानपुरे हे देखील त्या ठिकाणी आले. त्यांनीही रोहितची गच्ची धरून त्याला शिवीगाळ करत तोंडावर चापटा मारल्या. ​दरम्यान, रोहितचा मावस भाऊ सतीश वडलुर हा हे भांडण सोडवण्यासाठी आला असता, त्यालाही आरोपी गजानन काळे याने शिवीगाळ करत मारहाण केली.  

​सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार अन् गुन्हा दाखल-

​घटनेनंतर जखमी अवस्थेत रोहितने जोडभावी पेठ पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्याला वैद्यकीय उपचारासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) पाठवले. तेथे उपचार घेतल्यानंतर रोहितने २ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली.​या तक्रारीवरून जोडभावी पेठ पोलिसांनी आरोपी गजानन काळे आणि मल्लिकार्जुन सुलतानपुरे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ११८(१), ११५, ३५२ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.​या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार दुधाळे करत आहेत.

Post a Comment

0 Comments