सोलापूर - काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी महिला नेत्यांविषयी केलेल्या कथित वक्तव्याचे तीव्र पडसाद सोलापुरात उमटले आहेत. या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सोलापूर येथील काँग्रेस भवनासमोर आक्रमक आंदोलन केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्यातील महिला नेत्यांबद्दल सपकाळ यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले. माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला बांगड्यांचा हार घालून आणि जोरदार घोषणाबाजी करत आपला तीव्र रोष व्यक्त केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी अशा प्रकारचे वक्तव्य करून राज्यातील सर्वच महिलांचा अनादर केला आहे. त्यांनी या प्रकरणी संपूर्ण महिला वर्ग आणि जनतेची जाहीर माफी मागावी, अशी जोरदार मागणी तौफिक शेख व आंदोलकांनी या वेळी केली. या आंदोलनामुळे काँग्रेस भवनाबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

0 Comments