सोलापूर - शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली असून, महाराष्ट्राचे ग्रामविकास आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात वादग्रस्त व शिवराळ भाषा वापरल्याप्रकरणी त्यांच्यावर सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?-
काही दिवसांपूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधताना, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आता अस्तित्व राहिलेलं नाही, ते पुढची निवडणूक अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील," असा खोचक टोला लगावला होता. गोरे यांच्या या टीकेला उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक भूमिका घेत जयकुमार गोरेंविरोधात शिवराळ भाषेचा वापर केला होता.राऊत यांच्या या अपशब्दांनंतर भाजप कार्यकर्ते आणि नेते प्रचंड आक्रमक झाले असून राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद-
संजय राऊत यांच्या या वक्तव्याचे पडसाद सोलापुरात तीव्रतेने उमटले. भाजपचे सोलापूर महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी याप्रकरणी सोलापूरमधील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली.नगरसेवक मनीष केत यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

0 Comments