Ticker

6/recent/ticker-posts

क्राईम स्टोरी | "उमर उठ ना रे..." नवीन मोबाईल घेण्याचं स्वप्न अपूर्णच ; नई जिंदगीत तरुणाची निर्घृण हत्या

 


सोलापूर - घरात सुखाचे चार क्षण घालवण्यासाठी आलेल्या आणि नवीन मोबाईल घेण्याच्या उत्साहात घराबाहेर पडलेल्या तरुणाचा अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरात घडली आहे. उमर मौलाली बिराजदार असे या दुर्दैवी मयत तरुणाचे नाव असून, त्याच्या या अकस्मात आणि निघृण हत्येने बिराजदार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आनंदाचा क्षण ठरला शेवटचा... -

उमर हा गुलबर्गा (कर्नाटक) येथे चिकन सप्लायच्या गाडीवर काम करून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावत होता. ५ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री १:०० वाजताच्या सुमारास तो कामावरून घरी सोलापूरला आला होता. दुसऱ्या दिवशी दुपारी १२:३० वाजता उठून, आंघोळ व जेवण करून तो नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी दुपारी २:३० वाजता घरातून बाहेर पडला.

​रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने आणि त्याचा मोबाईल बंद येत असल्याने आई बिल्किस, बहीण साधनया आणि भाऊ अबुजर हे काळजीने त्याची वाट पाहत राहिले. मात्र, ६ ऑगस्टच्या सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास दोन मुलांनी घरी येऊन "उमर पाण्याच्या टाकीखाली बेशुद्धावस्थेत पडला आहे," अशी माहिती मिळाली.

​घटनास्थळावरील विदारक दृश्य -

​माहिती मिळताच भाऊ आणि आईने पाण्याच्या टाकीकडे धाव घेतली. तेथे उमर रक्ताच्या थारोळ्यात गवतात निपचित पडलेला दिसला. त्याच्या डोक्यावर, गालावर आणि हातावर गंभीर वार करण्यात आले होते.घटनास्थळी रक्ताचे डाग, एक काळे जॅकेट आणि बांबूची अर्धवट तुटलेली काठी पडलेली होती. पाण्याच्या टाकीच्या गेटजवळ उमरची बजाज डिस्कव्हर गाडी (क्रमांक MH13EU3147) आणि तिच्याखाली एक कोयता आढळून आला. पोलीस आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने उमरला तातडीने सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. 

पोलीस तपास सुरू -

​कोणत्यातरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून हत्याराने वार करून उमरचा खून केल्याची तक्रार त्याचा भाऊ अबुजर याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस निरीक्षक संगीता तुळशीदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या हत्येचा पुढील तपास वेगाने सुरू आहे. एका उमद्या तरुणाचा असा अचानक आणि क्रूर अंत झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  


Post a Comment

0 Comments