सोलापूर - स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर खरूड कारवाई करण्याच्या सूचनांनुसार सोलापूर ग्रामीण पोलीसांनी सांगोला तालुक्यातील मौजे कोळा गावाजवळ ओढ्याच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या गुंडांवर छापा टाकला. यात १४ लाख ५७ हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून, दोन आरोपी पळून गेले आहेत.पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप (स्थानिक गुन्हे शाखा) यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वपोनि जगताप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सांगोला पोलीस ठाण्याबरोबर समन्वय साधला.
पोलीस हवालदार विरेश कलशेट्टी व पोलीस शिपाई यश देवकते हे सांगोला पोलीस ठाण्याजवळ तैनात असताना गोपनिय बातमिदाराकडून माहिती मिळाली की, आबा कोळेकर व एक अज्ञात व्यक्ती जेसीबी मशीनच्या मदतीने ओढ्यातून वाळू उपसा करून ट्रॅक्टर ट्रॉलीत भरून चोरून विक्री करीत आहेत.तात्काळ तपास पथकाने घटनास्थळी धाव घेतली. छापा टाकताच आरोपींनी जेसीबी व ट्रॅक्टर सोडून पळ काढला. जागेवर जेसीबी इंडिया कंपनीचे ९ लाखांचे जेसीबी, ५ लाख ५० हजारांचे ट्रॅक्टर-ट्रॉली व ७ हजार रुपयांचे ब्रास वाळू (एकूण १४.५७ लाख) जप्त करण्यात आले. सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोह/भरमशेट्टी करीत आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विशाल वायकर, हवालदार कलशेट्टी व शिपाई देवकते यांच्या यशस्वी कामगिरीमुळे निवडणूक काळात अवैध धंदे थांबवण्यास मदत झाली. पोलीसांनी सर्वत्र सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

0 टिप्पण्या