सोलापूर - विजापूर वेस परिसरातील मार्कंडेय मंदिराजवळ दोघांवर कोयता आणि बर्फ फोडण्याच्या टोच्याने हल्ला झाल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात रियान कुरेशी, समीर कुरेशी, साहील कुरेशी आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध शस्त्र अधिनियमासह भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालीब सादिक कुरेशी हे १३ सप्टेंबर रोजी रात्री मित्र मुजाहिद बागवान यांच्यासोबत मोटारसायकलवरून मार्कंडेय मंदिराजवळ गेले होते. तेथे रियान कुरेशी, समीर कुरेशी, साहील कुरेशी आणि त्यांच्यासोबत एक अनोळखी व्यक्ती उपस्थित असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीनुसार, समीर कुरेशी याने तालीब कुरेशी यांना एका महिलेच्या मोबाईलवर मेसेज आणि कॉल का करतो, अशी विचारणा केली. त्यानंतर त्याने कोयता काढून तालीब यांच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तालीब यांनी डावा हात मध्ये घातल्याने त्यांच्या कानाला आणि डाव्या हाताच्या तळव्याला दुखापत झाली. त्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने त्यांना धरून ठेवले, तर साहील कुरेशी याने बर्फ फोडण्याच्या टोच्याने त्यांच्या पाठीवर वार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, तालीब यांचा मित्र मुजाहिद बागवान हा त्यांना सोडवण्यासाठी मध्ये आला असता, समीर कुरेशी याने त्याच्या चेहऱ्यावर कोयत्याने वार करून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. जखमी तालीब आणि मुजाहिद यांना सोनू कुरेशी याने मोटारसायकलवरून सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
या प्रकरणी तालीब सादिक कुरेशी यांच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वर्षाराणी मारुती सुतार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.