Ticker

6/recent/ticker-posts

भोंदूबाबा अशोक खरातचे आता 'सोलापूर कनेक्शन' उघड; शक्तीपीठ महामार्गाच्या कडेला खरेदी केली कोट्यवधींची जमीन

 





नाशिक/सोलापूर: नाशिकचा बहुचर्चित भोंदूबाबा अशोक खरात याच्या पापकर्मांचा पाढा आता सोलापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे. नाशिक, शिर्डी आणि नगर जिल्ह्यात जमिनींचे साम्राज्य उभे करणाऱ्या खरातने सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता जमवल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे, ही जमीन प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या टप्प्यात येत असल्याने प्रशासकीय गोटातून खरातला माहिती पुरवली जात होती का, असा संशय बळावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात आणि त्याचा सीए ललित पोफळे यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावात ही कोट्यवधींची जमीन खरेदी केली आहे. या दोघांनी एकाच गावात दोन मोठे व्यवहार केले असून, त्याची एकूण किंमत ७ कोटी रुपयांच्या आसपास आहे.

जमिनीच्या व्यवहाराचा तपशील:

  • व्यवहार १ (२८ मार्च २०२४): कळमण गावातील गट नंबर २०० मध्ये ४.४८ हेक्टर (सुमारे ११ एकर) जमीन खरेदी करण्यात आली. कागदोपत्री याची किंमत २ कोटी ४० लाख ९१ हजार २०० रुपये दाखवण्यात आली आहे.

  • व्यवहार २ (२० जून २०२४): पहिल्या व्यवहारानंतर अवघ्या तीन महिन्यात खरात आणि पोफळे यांनी गट नंबर १९७/२, १९८/१ आणि १९८/२ मध्ये ७.५२ हेक्टर (सुमारे १९ एकर) जमीन खरेदी केली. याची किंमत ४ कोटी १२ लाख ८० हजार रुपये आहे.

शक्तीपीठ महामार्गाचा 'योगायोग' की कट?

अशोक खरातने ज्या कळमण गावात जमिनी घेतल्या आहेत, नेमक्या त्याच भागातून महाराष्ट्रातील बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. महामार्गाच्या नियोजित मार्गावरच ही जमीन खरेदी केल्यामुळे खरातला या प्रकल्पाची आगाऊ माहिती आधीच मिळाली होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर ही माहिती त्याला मिळाली असेल, तर महसूल विभाग किंवा प्रशासनातील कोणी बडा अधिकारी त्याच्या संपर्कात होता का, याचा तपास होणे आता गरजेचे बनले आहे.

अडचणीत वाढ, पोलिसांची कसून चौकशी

अशोक खरातवर सध्या १५ गुन्हे दाखल असून पोलीस कोठडीत त्याची कसून चौकशी सुरू आहे. नाशिक पोलिसांनी त्याच्या मालमत्तांची माहिती घेण्यास सुरुवात केल्यावर हे सोलापूरचे धागेदोरे हाती लागले आहेत. सीए ललित पोफळे याचेही नाव या व्यवहारात समोर आल्याने आता खरातसोबतच पोफळेच्या अडचणीतही मोठी वाढ झाली आहे. या धक्कादायक खुलाशामुळे सोलापूर जिल्ह्यातही खळबळ उडाली असून, या जमिनींच्या खरेदीसाठी वापरण्यात आलेला पैसा नेमका कोणाचा होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत.


Post a Comment

0 Comments