सोलापूर - आपल्या चिरतरुण आवाजाने सात दशकांहून अधिक काळ रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून, जगभरातील कलाविश्वात शोककळा पसरली आहे.आशाताईंच्या निधनामुळे सोलापूरचे प्रसिद्ध गायक मोहम्मद आयाज यांना मोठा धक्का बसला आहे. आयाज यांचे आशाताईंशी गेल्या 15 वर्षांपासून जिव्हाळ्याचे संबंध होते.
मोहम्मद आयाज यांनी अत्यंत भावूक होत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, "आज मी जो काही आहे आणि मला जी जगभरात प्रसिद्धी मिळाली, ती केवळ आशाताईंनी दिलेल्या प्रेरणेमुळेच. त्या माझ्यासाठी केवळ मार्गदर्शक नव्हत्या, तर एका आधारस्तंभाप्रमाणे होत्या.गेल्या 15 वर्षांपासून आयाज हे आशाताईंच्या संपर्कात होते. संगीतातील बारकावे असोत किंवा वैयक्तिक मार्गदर्शन, आशाताईंनी त्यांना नेहमीच मोलाची साथ दिली.
अवघ्या चार दिवसांपूर्वीच मोहम्मद आयाज यांनी आशाताईंना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यावेळी झालेल्या संवादात त्या नेहमीप्रमाणेच मायेने बोलल्या होत्या, अशी आठवण त्यांनी सांगितली.आशा भोसले यांनी केवळ मराठी आणि हिंदीच नव्हे, तर अनेक भारतीय व परदेशी भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टी, राजकीय नेते आणि चाहत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. सोलापूरच्या कलाक्षेत्रातूनही या महान गायिकेला आदरांजली अर्पण करण्यात येत असून, मोहम्मद आयाज यांच्यासारख्या अनेक कलाकारांनी आपल्या लाडक्या 'आशाताई' गमावल्याची भावना व्यक्त केली आहे.

0 Comments