Ticker

6/recent/ticker-posts

हुंड्याची हाव अन् संसाराचा अंत: मोहोळमध्ये विवाहितेचा गळा दाबून खून; पतीसह सासू गजाआड

 




मोहोळ: लग्नात टीव्ही, फ्रिज दिला नाही, मानपान केला नाही आणि माहेरून पैसे घेऊन ये... यांसारख्या क्षुल्लक कारणावरून सुरू असलेल्या छळाचा शेवट एका भीषण खुनाने झाला आहे. मोहोळ तालुक्यातील सारोळे येथे एका २६ वर्षीय विवाहितेचा तिच्या पतीने आणि सासूने संगनमत करून गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोनाली प्रतीक शिंदे असे मृत दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रविवार, १२ एप्रिल रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. रविवारी सकाळी जावई प्रतीक शिंदे याने सासरे दत्तात्रय सुरवसे यांना फोन केला. "मी आणि सोनाली रात्री ११ वाजता झोपलो होतो, सकाळी ती उठत नाहीये," असा बनाव प्रतीकने रचला. घाबरलेल्या वडिलांनी तिला तातडीने दवाखान्यात नेण्यास सांगितले. मात्र, मोहोळ ग्रामीण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सोनालीचा मृत्यू झाला होता.

सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा भास आरोपींकडून निर्माण करण्यात आला होता. मात्र, लेकीचा मृतदेह पाहून वडील दत्तात्रय सुरवसे यांना संशय आला. त्यांनी तातडीने मृतदेह सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेला. शवविच्छेदन अहवालात धक्कादायक वास्तव समोर आले; सोनालीचा मृत्यू नैसर्गिक नसून तिचा गळा दाबून खून करण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणी दत्तात्रय खंडू सुरवसे (रा. कोर्टी ता. पंढरपुर) यांनी जावई प्रतीक शिंदे व सासू-भामाबाई शिंदे यांच्या विरोधात मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक नवनाथ पाटील हे करीत आहेत.



Post a Comment

0 Comments