Ticker

6/recent/ticker-posts

स्मार्ट सिटीची 'स्मार्ट' सेवा कोलमडली; मनपाच्या वेबसाईटला तांत्रिक ग्रहण





सोलपूर  - नागरिकांना घरबसल्या विविध शासकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी सोलापूर महानगरपालिकेने जन्म-मृत्यू नोंदणी, मिळकत कर भरणा आणि बांधकाम परवाना यांसारख्या महत्त्वाच्या सेवा ऑनलाइन सुरू केल्या होत्या. मात्र, गेल्या ५ ते ६ दिवसांपासून मनपाची अधिकृत वेबसाईट तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.डिजिटल इंडियाच्या काळात महापालिका प्रशासनाने सर्व सेवा ऑनलाइन करण्याचा निर्णय स्वागतार्ह मानला जात होता. यामुळे नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचणार होते. मात्र, ऐनवेळी वेबसाईट कोलमडल्याने नागरिकांच्या नियोजनावर पाणी फिरले आहे. विशेषतः, ज्यांना कराची थकबाकी भरायची आहे किंवा ज्यांना तातडीने जन्म-मृत्यू दाखल्यांची गरज आहे, अशांची मोठी अडचण होत आहे.



वेबसाईट बंद असल्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा महापालिकेच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे ऑनलाइन सुविधेचा उद्देशच धूसर झाला आहे. अनेक नागरिकांनी तक्रार केली आहे की, वारंवार प्रयत्न करूनही वेबसाईट उघडत नाही, ज्यामुळे कामांचा खोळंबा झाला आहे.याबाबत मनपा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन तांत्रिक बिघाड दुरुस्त करावा आणि नागरिकांना होत असलेला नाहक्क त्रास थांबवावा, अशी मागणी सोलापूरकर करत आहेत. प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढला नाही, तर नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास कमी होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments